Site icon रुपयाची कथा

WhatsApp आणि Telegram वर स्टॉक मार्केट स्कॅम कसे ओळखावे? स्कॅमपासून सुरक्षित राहण्याचे 7 मार्ग!

स्कॅम
स्कॅम

तुम्ही कधी WhatsApp किंवा Telegram वर असे संदेश पाहिले आहेत का, ज्यात “स्पेशल स्टॉक मार्केट टिप्स “ किंवा “इनसाईड न्यूज” मिळाल्याचे सांगितले जाते? हा संदेश वाचताना तुम्हाला असे वाटते की, “व्वा, ही खरोखर एक उत्तम संधी आहे!”, पण थोडे थांबा. जर काही खूपच चांगलं वाटत असेल तर, त्यात काहीतरी गडबड असण्याची शक्यता नक्कीच आहे.

आजकाल गुंतवणुकीचे आकर्षण वाढत आहे, त्यामुळे स्कॅमर्स सुद्धा लोकांच्या मागे लागले आहेत. हे लोक तुमच्यावर विश्वास बसवून, तुमचे पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करतात. या लेखात आपण याच विषयावर चर्चा करू – या फसवणुकीच्या सापळ्यांपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे!


हे देखील वाचा: मोठ्या रकमेची गुंतवणूक कशी करावी?

विषयसूची

Toggle

WhatsApp आणि Telegram वर सामान्य गुंतवणूक स्कॅम:

प्रत्येक वेळी स्कॅम वेगवेगळ्या प्रकारांनी तुमच्या समोर येतो. चला, काही सामान्य स्कॅमचे प्रकार पाहूया ज्यांना तुम्ही WhatsApp किंवा Telegram वर सहज ओळखू शकता.


१. “इन्साईड टिप” स्कॅम:

ही फसवणूक थोडीशी “गुप्त माहिती” सारखी वाटते. समजा, कोणी तुम्हाला म्हणतं, “माझा एक मित्र आहे, जो एका मोठ्या कंपनीत काम करतो. त्या कंपनीने मोठी घोषणा करायची ठरवली आहे. तू लगेच स्टॉक विकत घे!” हे ऐकायला आकर्षक वाटतंय ना? पण, ९०% वेळा ही माहिती खोटी असते.

२. “गॅरंटीड रिटर्न्स” स्कॅम:

हे स्कॅमर तुम्हाला असं म्हणतात की, “₹10,000 गुंतवा, आणि एका महिन्यात ₹1 लाख कमवा!” काहीतरी खूप चांगलं वाटतंय, पण असं कधीच होत नाही. जास्तीत जास्त फायदा कमावण्याचे हमी देणारे स्कॅम्स हमखास बनावट असतात.

३. “फेक एक्स्पर्ट” स्कॅम:

इथे एक “स्टॉक मार्केट गुरू” तुमच्यासमोर उभा राहतो, जो स्वतःला मोठा एक्स्पर्ट म्हणवतो. तो एक ग्रुप तयार करतो आणि तुम्हाला काही “महत्त्वाच्या टिप्स” देतो. सुरुवातीला तुम्हाला हे सगळं बरोबर वाटतं, पण त्याचं अंतिम उद्दिष्ट फक्त एकच असतं – तुमचं विश्वास जिंकून तुमच्याकडून पैसे काढून घेणं. कुठलाही एक्स्पर्ट तुम्हाला ठराविक गॅरंटीड रिटर्न्स मिळेलच असे आमिष दाखवून तुम्हाला गुंतवणूक करायला सांगनार नाही.

४. “लिमिटेड टाइम ऑफर” स्कॅम:

“ही संधी फक्त २ तासांसाठी आहे, आता लगेच निर्णय घ्या!” अशा प्रकारच्या गोष्टी सांगून तुम्हाला घाईघाईत निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं जातं. वास्तविक, कोणताही चांगला निर्णय घाईघाईत घेतला जात नाही.

५. “पॉन्झी स्कीम” स्कॅम:

पॉन्झी स्कीम थोडी अधिक क्लिष्ट आहे. सुरुवातीला, स्कॅमर जुन्या गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणूकदारांच्या पैशातून पैसे देतात, ज्यामुळे तुम्हाला वाटतं की ही योजना काम करतेय. पण शेवटी, हा सिस्टिम पूर्णपणे कोसळतो. अशी बरीच उदाहरणे तुम्ही तुमच्या आजूबाजूला हल्ली घडलेली ऐकली असतील.

हे देखील वाचा: महागाई चा परिणाम: १०, २०, ३० वर्षांनंतर १ कोटी रुपयांचे मूल्य किती असेल?


WhatsApp आणि Telegram वर स्कॅमर्स कसे फसवतात?

या प्लॅटफॉर्मवर फसवणूक होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा सहज वापर आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता. स्कॅमर अशा प्लॅटफॉर्मचा वापर का करतात ते जाणून घेऊया:

हे देखील वाचा: SWP: खात्रीशीर मासिक उत्पन्नासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना!



गुंतवणूक फसवणूक टाळण्यासाठी ७ महत्त्वाचे सल्ले:

गुंतवणूक करताना फसवणूक टाळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण बाजारात अनेक लोक फसवणुकीच्या संधी शोधत असतात. आता तुम्हाला थोडक्यात ७ महत्त्वाचे सल्ले सांगतो जे पैसे गुंतवण्यासाठीचे निर्णय घेण्यास तुम्हाला मदत करतील.

१. कमी वेळेत जास्त रिटर्न्स ची गॅरंटी म्हणजे धोक्याची घंटा:

तुला जर कोणी “१०,००० गुंतव आणि महिन्याभरात १ लाख मिळव” असं सांगत असेल, तर ही नक्कीच फसवणूक आहे. भारतीय शेअर बाजारामध्ये साधारण १२-१५% परतावा मिळतो, आणि तो देखील दीर्घकालीन गुंतवणुकीनंतर. जर कोणी त्यापेक्षा खूप जास्त परतावा सांगत असेल, ते कदाचित तुम्हाला फसवण्याच्या विचारात आहेत. म्हणजेच, जर ऑफर खूपच आकर्षक वाटत असेल, तर ती खोटी असण्याची शक्यता असते.

२. सल्लागाराचे प्रमाणपत्र तपासा:

आजकाल कोणीही स्वतःला “फायनान्शियल एक्स्पर्ट” किंवा “स्टॉक मार्केट गुरू” म्हणतं. पण खरं म्हणजे, सगळे तज्ञ नसतात. जर कोणी तुला सल्ला देत असेल तर त्याच्याकडे SEBI (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) नोंदणी आहे का ते पाहा. SEBI नोंदणीकृत सल्लागार हे खरे तज्ञ असतात, जे योग्य सल्ला देऊ शकतात. नोंदणी क्रमांक मागा, आणि SEBI च्या वेबसाइटवर तपासा.

३. कधीही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका:

तुम्हाला जर कोणी लगेच निर्णय घेण्यास भाग पाडत असेल, तर सावध व्हा. “आत्ताच गुंतवा नाहीतर संधी निघून जाईल” असं सांगून तुम्हाला गोंधळवण्याचा प्रयत्न करतात. योग्य गुंतवणुकीच्या संधी या तशा लवकर संपत नाहीत. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. घाईत घेतलेले निर्णय कधीही चांगले नसतात.

४. “गुप्त माहिती (इन्साईड टिप)” पासून सावध रहा:

कोणीतरी  एखाद्या स्टॉकबद्दल गुप्त माहिती देत असेल, तर ती जवळजवळ खोटी असते. आणि असं गृहीत धरलं तरी, “इन्साइडर ट्रेडिंग” हे बेकायदेशीर आहे. कोणीही सांगत असेल की त्यांना “खास माहिती” मिळाली आहे आणि त्याचा फायदा घ्या, तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण अशी माहिती सहसा फसवणूक करण्यासाठीच वापरली जाते.

५. स्वतः संशोधन करा:

गुंतवणुकीसाठी नेहमी स्वतः रिसर्च करा. कोणीतरी एखादा स्टॉक सुचवत असेल, पण तो खरंच फायदेशीर आहे का ते जाणून घ्या. स्टॉकची वार्षिक अहवालं बघा, कंपनीच्या आर्थिक स्थितीची माहिती घ्या, विश्वासार्ह आर्थिक वेबसाइट्सवर त्याबद्दल वाचा. यामुळे योग्य निर्णय घेता येईल. जेव्हा स्वतःचा रिसर्च असतो, तेव्हा कोणी फसवण्याचा प्रयत्न केला तरी लगेच लक्षात येईल.

६. वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा:

कधीच तुमची बँक डिटेल्स, PAN नंबर, आधार नंबर, किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती अज्ञात व्यक्तींना सांगू नका. हे स्कॅमर्स तुम्हाला फसवण्यासाठी या माहितीचा गैरवापर करू शकतात. म्हणूनच नेहमी काळजी घ्या आणि कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करण्याआधी दहा वेळा विचार कर.

७. अधिकृत अ‍ॅप्स चा वापर:

जर गुंतवणूक करायची असेल, तर फक्त अधिकृत अ‍ॅप्स चा वापर करा. Google Play Store किंवा Apple App Store वर उपलब्ध अ‍ॅप्सवरच विश्वास ठेवा. तुम्हाला WhatsApp किंवा Telegram वर एखाद्या लिंकद्वारे अ‍ॅप डाउनलोड करण्याचा सल्ला दिला तर, तो बेकायदेशीर किंवा फसवणुकीचा असू शकतो. त्यामुळे फक्त प्रमाणित, अधिकृत अ‍ॅप्सचा वापर करा.

हे देखील वाचा: सर्वोत्तम परताव्यासाठी: टॉप-अप SIP टकाटक!


फसवणूक झाल्यास काय करावे?

जर तुम्हाला वाटतं की तुम्ही स्कॅममध्ये सापडलात, तर खालील पद्धतीने त्वरित कृती करा:

१. संवाद बंद करा:

संपूर्ण संभाषणाचा पुरावा जमा करा आणि स्कॅमरशी बोलणे थांबवा.

२. पोलिसांशी संपर्क साधा:

तुमच्या जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा किंवा cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार दाखल करा.

३. तुमच्या बँकेला कळवा:

तुमच्या बँकेला लगेच माहिती द्या, ज्यामुळे ते काही आर्थिक व्यवहार थांबवू शकतील.

४. SEBI कडे तक्रार करा:

जर स्कॅम शेअर बाजाराशी संबंधित असेल, तर SEBI च्या SCORES पोर्टलवर तक्रार दाखल करा.

हे देखील वाचा: गुंतवणूक करण्याआधी हे समजून घेतले का? जाणून घ्या ॲसेट क्लास म्हणजे नक्की काय?


FAQs:

१. WhatsApp आणि Telegram वर आलेल्या अनोळखी व्यक्तीच्या स्टॉक टिप्सवर विश्वास ठेवावा का?
तुम्ही या टिप्सवर विश्वास ठेवू नका. बहुतेक वेळा या टिप्स फसवणूक असतात आणि तुमच्या आर्थिक फायद्याचा वापर करून तुम्हाला फसवतात.

२. फसवणूक झाल्यास काय करावे?
तुम्ही त्वरित पोलिसात तक्रार नोंदवा, बँकेशी संपर्क साधा, आणि SEBI ला याची माहिती द्या.

३. कोणत्या वेबसाइट्सवर विश्वास ठेवावा?
फक्त अधिकृत वित्तीय वेबसाइट्स जसे की SEBI, NSE किंवा BSE च्या संकेतस्थळांवरच विश्वास ठेवा.


निष्कर्ष:

WhatsApp आणि Telegram वर गुंतवणूक स्कॅम्स आजकाल सामान्य झाले आहेत. त्यामुळे, कोणत्याही अनोळखी संदेशांवर विश्वास ठेवण्याआधी, काळजीपूर्वक विचार करा. तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य संशोधन करा, आणि नेहमीच विश्वासार्ह वित्तीय स्रोतांचा आधार घ्या. फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी आणि माहिती हीच सर्वोत्तम शस्त्र आहेत. घाईगडबडीत घेतलेले निर्णय, खास माहिती, किंवा प्रचंड परताव्याचं आश्वासन देणाऱ्या योजना नेहमीच फसवणूकीच्या असू शकतात. सतर्क रहा, शहाणपणाने गुंतवणूक करा, आणि सुरक्षित राहा!


तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि शेअर बाजाराशी निगडीत अजून माहिती  येथे वाचा!

Disclaimer: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा.

Exit mobile version