Site icon रुपयाची कथा

विमा क्षेत्रातील 7 गैरसमज आणि सत्य!

विमा
विमा

विमा क्षेत्राबद्दल असलेले गैरसमज आणि त्यामागचे सत्य:

आरोग्य विमा क्षेत्रात अर्थात हेल्थ इन्शुरन्स क्षेत्राच्या बाबतीत सर्वसामान्य माणसांत अजूनही काही गैरसमज आहेत. त्यामुळे अनेक लोक हेल्थ इन्श्युरन्स घेण्यास घाबरतात किंवा मग चुकीच्या पॉलिसी मध्ये फसले जातात. आजच्या काळात उपचारांवरील खर्च पाहता आरोग्य विमा हा काळाची गरज आहे, त्यापासून वंचित राहून चालणार नाही. पण ‘चांगला आरोग्य विमा’ हा व्यक्तिपरत्वे बदलत जातो. आरोग्य विमा घेण्यापूर्वी आपल्या मनातील गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. चला, या लेखात आपण त्याबद्दल चर्चा करू आणि या गैरसमजांचे खरे रूप समजून घेऊ.

हे देखील वाचा: विमा म्हणजे काय ? विमाचे प्रकार समजून घ्या, आपल्यासाठी योग्य विमा कसा निवडावा ?

गैरसमज 1: भारतीय हेल्थ इन्श्युरन्स कंपन्या क्लेम देत नाहीत:

खूप लोक असा विचार करतात की इन्श्युरन्स कंपन्या क्लेम सहजपणे सेटल करत नाहीत. पण वास्तवात, 2020-21 च्या IRDAI च्या अहवालानुसार, भारतीय इन्श्युरन्स कंपन्यांनी जवळपास 95-97% क्लेम्स सेटल केले आहेत. उदाहरणार्थ, रिलायन्स जनरल इन्श्युरन्स 98% क्लेम सेटलमेंट रेटसह दोन तासांच्या आत कॅशलेस क्लेमची हमी देते. त्यामुळे, जर तुम्ही योग्य प्रकारे सर्व कागदपत्रे भरली असतील, तर क्लेम प्रक्रिया अगदी सोपी होते.

गैरसमज 2: कर्करोग आणि मधुमेह कव्हर केले जात नाहीत:

मुळात हेल्थ इन्शुरन्स मध्ये ‘वेटिंग पिरीयड’ अशी एक अट असते. त्यामध्ये पॉलिसी सुरू केल्यानंतर पहिले 30 दिवस काही आजारांना क्लेम मिळत नाही. त्यानंतर 2 वर्षांचा एक ‘वेटिंग पिरीयड’ असतो जो काही आजारांना लागू होतो. शिवाय काही विशिष्ट आजारांना आयुष्यभर क्लेम मिळत नाही. या अटी आधीच स्पष्ट केलेल्या असतात. कर्करोग आणि मधुमेह बद्दल बोलायचं झालं तर बहुतांश हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कर्करोग आणि मधुमेह कव्हर केले जातात, परंतु पूर्वी अस्तित्वात असलेले आजार असल्यास प्रतीक्षा कालावधी असतो. तुम्ही तुमच्या पॉलिसीमध्ये ॲड-ऑन कव्हर निवडून तुमच्या गरजा पूर्ण करू शकता. त्यामध्ये स्पेशल काही रायडर जोडले तर फायदा होऊ शकतो. पण त्यासाठी आरोग्याची आणि आजारांची खरी माहिती देणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा: हेल्थ इन्श्युरन्स: असे मिळवा जास्त फायदे!

गैरसमज 3: कंपनीचा ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स पुरेसा आहे:

तुमच्या कंपनीच्या ग्रुप हेल्थ इन्श्युरन्सवर अवलंबून राहणे योग्य नाही, कारण नोकरी बदलल्यानंतर ते कव्हर बंद होते. त्यामुळे, तुमच्याकडे नेहमीच स्वतःची स्वतंत्र हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी असणे गरजेचे आहे. तुम्ही टॉप-अप प्लॅन सारख्या पर्यायांवर विचार करू शकता. दीर्घकाळासाठी स्वतंत्र हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं ठरतं कारण कालांतराने सर्व वेटिंग पिरीयड संपल्याने पूर्ण क्लेम सेटल होतात.

गैरसमज 4: भारतातील हेल्थ इन्श्युरन्स महाग आहे:

हे पूर्णपणे खोटे आहे! भारतात हेल्थ इन्श्युरन्स खूप परवडणारा आहे. तुम्ही तिमाही किंवा अर्धवार्षिक हप्त्यांमध्ये प्रीमियम भरू शकता, ज्यामुळे आर्थिक बोजा कमी होतो. याशिवाय, तुम्ही पॉलिसी प्रीमियमवर 80G कर कपातीचा फायदा देखील घेऊ शकता. हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम वयानुसार बदलत जातात, त्याचाही अभ्यास केला तर योग्य दरात चांगली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मिळू शकते.

गैरसमज 5: धुम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना इन्श्युरन्स मिळत नाही:

माझ्या एका मित्राने एकदा मला विचारल की, ” धुम्रपान करणार्‍यांना आणि दारू पिण्यारांना हेल्थ इन्श्युरन्स मिळत नाही का?” पण खरं सांगायचं तर, हे गैरसमज आहेत. तुम्ही धुम्रपान किंवा मद्यपान करत असलात तरी तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स मिळू शकतो. फक्त एवढंच आहे की, तुमच्या प्रीमियमची रक्कम थोडी जास्त असेल. काही इन्श्युरन्स कंपन्या कदाचित आरोग्य तपासणीची मागणी करतील, पण बहुतांश कंपन्यांना फक्त पूर्वीच्या वैद्यकीय परिस्थितीबद्दल माहिती हवी असते, ती तुम्ही पॉलिसी घेण्याच्या वेळी जाहीर करावी लागते.

तर मित्रा, धुम्रपान किंवा मद्यपान करणं हेल्थ किंवा टर्म इन्श्युरन्स घेण्यात अडथळा ठरत नाही, फक्त तुम्हाला योग्य माहिती दिली पाहिजे.  (जरी तुम्हाला धुम्रपान किंवा मद्यपान करून विमा पॉलिसी मिळू शकते, तरीही आरोग्यासाठी या गोष्टींचं सेवन करणं टाळणं हेच सर्वोत्तम आहे. विमा मिळणे ठीक आहे, पण तुमचं शरीर ही तुमची  सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे धुम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहणं तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी फायद्याचं ठरेल.)

गैरसमज 6: पर्यायी उपचार कव्हर होत नाहीत:

हे खरं आहे की आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी यांसारखे पर्यायी उपचार हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कव्हर केले जात नाहीत, पण त्यातही काही कंपन्या नवनवीन प्लॅन आणून या उपचारांवरील खर्च क्लेम मधून देतात. इथे परत एकदा पॉलिसी घेणार्‍याची जबाबदारी वाढते की पूर्ण रिसर्च करून पॉलिसी घेणे. पॉलिसी घेण्याआधी तुमच्या इन्श्युररकडे पर्यायी उपचारांबाबत विचारणा करा. त्यासाठी काही विशिष्ट ‘रायडर’ घ्यावे लागतात त्याबद्दलही विचारणा करून घेणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा: वाहन विमाच्या निवडीत होणाऱ्या 5 सामान्य चुका आणि त्यांना कसे टाळाल?

गैरसमज 7: हॉस्पिटल नेटवर्क्स फक्त मोठ्या शहरांमध्ये आहेत

अनेक लोकांचा असा समज आहे की इन्श्युरन्स कंपन्यांचे हॉस्पिटल नेटवर्क फक्त मोठ्या शहरांपुरते मर्यादित आहे, परंतु प्रत्यक्षात ते टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्येही आहेत. जिल्हा पातळीवर बरेच हॉस्पिटल आता जोडले गेले आहेत. तुमच्या सोयीच्या हॉस्पिटलचा ज्या कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये समावेश आहे त्या कंपनीची पॉलिसी घेऊ शकता किंवा पॉलिसी पोर्टचा सुद्धा पर्याय आहे.

आपल्याला अजूनही काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारा किंवा आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉइन करा. अशाच प्रकारे आपण पुढील भागात टर्म इन्शुरन्स बाबतीत माहिती घेणार आहोत


FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

प्र. भारतीय इन्श्युरन्स कंपन्या क्लेम देतात का?
उ: होय, 95-97% क्लेम्स भारतीय कंपन्या IRDAI च्या मार्गदर्शनानुसार सेटल करतात.

प्र. कर्करोग आणि मधुमेह हेल्थ इन्श्युरन्समध्ये कव्हर होतात का?
उ: होय, बहुतांश पॉलिसीमध्ये कर्करोग आणि मधुमेह कव्हर होतात, फक्त प्रतीक्षा कालावधी लागू शकतो.

प्र. ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स पुरेसा आहे का?
उ: नाही, कारण नोकरी बदलल्यानंतर तो कव्हर संपतो. स्वतःची पॉलिसी असणे आवश्यक आहे.

प्र. धुम्रपान करणाऱ्यांना हेल्थ इन्श्युरन्स मिळतो का?
उ: होय, धुम्रपान करणाऱ्यांना हेल्थ इन्श्युरन्स मिळतो, परंतु जास्त प्रीमियम लागतो.


Disclaimer: हा लेख केवळ सामान्य माहिती देण्यासाठी आहे आणि याचा उद्देश विक्रीसाठी प्रोत्साहन देणे हा नाही. कृपया विमा खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाशी संबंधित दस्तऐवज, अटी व शर्ती, आणि नियम काळजीपूर्वक वाचा.

विमा खरेदीच्या निर्णयांपूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.

कर लाभ आयकर कायदा, १९६१ अंतर्गत आहेत आणि वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा लागू होऊ शकतात.

Exit mobile version