Site icon रुपयाची कथा

एक गुंतवणूक कथा!

गुंतवणूक
गुंतवणूक

एक गुंतवणूक कथा!

गुंतवणुकीचा एक प्रेरणादायी किस्सा तुम्हाला या लेखामध्ये वाचायला मिळेल. गोष्ट सुरू होते 22 वर्षांपूर्वी! एक व्यापार करणारा व्यक्ति कामानिमित्त नेहमीच्या बँकेत जातो. तिथे त्याचा मित्र मॅनेजर म्हणून कार्यरत असतो. तो काळ असा होता की बँकेत फार गर्दी-गोंधळ असायचा नाही. तो व्यक्ति आणि मॅनेजर मित्र बोलत बसलेले असताना एक बँकेत काम करणारा एक कर्मचारी येऊन मॅनेजरला काही फॉर्म दाखवून बरोबर आहे का वगैरे विचारून जात असताना ‘गुंतवणूक’ हा शब्द त्या व्यक्तीच्या कानावर पडतो. तो व्यक्ति मॅनेजरला त्याबद्दल विचारतो. त्या काळात गुंतवणूक वगैरे या फार असाध्य आणि क्लिष्ट बाबी वाटायच्या. तरीही मॅनेजर त्या व्यक्तिला अर्थात मित्राला जमेल तितकं सांगतो!

पहिली चर्चा:

ते चर्चा करत होते ‘लहान मुलांच्या म्युच्युअल फंड’ बद्दल! Children’s Mutual Fund बद्दल! त्या काळात म्युच्युअल फंड हा शब्दही बहुतांश जनतेला माहीती नव्हता. शिवाय त्याकाळी Financial Distributors सुद्धा फार नव्हते किंवा माहीत मिळवण्यासाठी कुठला स्रोत नसायचा.
त्या व्यक्तिला या गुंतवणुकीत रस असतो. नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी तो त्या क्षेत्रातील जाणकारांना भेटतो आणि अधिक माहिती घेतो. मुळात व्यापारी असल्याने जोखीम घेण्याची वृत्ती तर होतीच आणि अधिकचा परतावा मिळवण्याची संधी सुद्धा साधण्याची कला होती!

हे देखील वाचा: SWP: खात्रीशीर मासिक उत्पन्नासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना!

पहिली गुंतवणूक:

जवळपास स्वतःजवळील एक लाख रुपये ती व्यक्ति एका Children’s Mutual Fund मध्ये गुंतवते. आज 1 लाख रुपये मोठी रक्कम वाटत नसली तरी त्याकाळी एक लाखांचं मूल्य खूप जास्त होतं. हा तो काळ होता जेंव्हा लोकांना टीव्ही वरुन ‘कौन बनेगा करोडपती’ अशी स्वप्ने दाखवली जात असत.
गुंतवणूक तर झाली! गुंतवणूक थेट त्या व्यक्तीच्या मुलीच्या नावाने झाली होती. बराच काळ निघून गेला. त्या गुंतवणुकीकडे बघितलं सुद्धा गेलं नाही. पण गुंतवणुक कमी-जास्त करत वाढीस लागली होती. 2021 मध्ये कोरोनाने त्या व्यक्तिचं निधन होतं. गुंतवणुकीच्या बाबतीत कोणालाही आठवत नाही. नंतर 2023 मध्ये त्या व्यक्तीच्या पत्नीला केलेल्या गुंतवणुकीची आठवण होते. कागदपत्रांची शोधाशोध होते आणि काही कागदपत्रे सापडतात! मग सुरू होतो पैसे परत मिळवण्याचा प्रवास!

हे देखील वाचा: मोठ्या रकमेची गुंतवणूक कशी करावी?

आठवण आणि परतावा:

गुंतवणूक करणारी व्यक्ति हयात नसल्याने पैसे मिळतील की नाही अशी शंका कुटुंबीयांना वाटते. पण मुलीच्या नावाने गुंतवणूक केल्याने ते मिळतील हे स्पष्ट होतं. आज अगदी तालुका पातळीवर Financial Distributors असल्याने त्यांना पैसे परत मिळवण्याच्या प्रक्रियेत सहकार्य आणि मार्गदर्शन सहज मिळालं. बरीच प्रोसेस करावी लागली आणि शेवटी काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर पैसे मिळाले!

हे देखील वाचा: शेअर बाजारात खरच फायदा होतो का  ? 

एक लाख रुपयांचं 26 लाखांमध्ये रूपांतर:

सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीने एकरकमी 1 लाख रुपये गुंतवले होते आणि नंतर त्यात काहीच वाढ केली नव्हती. त्या 1 लाखाचे तब्बल 26 लाख रुपये मिळाले! त्या Children’s Mutual Fund मध्ये सामान्य 16% चक्रवाढ व्याज मिळाले आणि इतका मोठा परतावा मिळाला. आज त्या 26 लाखाच्या मूल्याच्या आधारावर आज महिना 17000 रुपये मासिक पेन्शन सुरू झालं असतं किंवा एकरकमी पैसे घेऊन पूर्ण लाभदेखील उचलता आला असता.

हे देखील वाचा: ऑनलाइन फ्लॅट घ्या, आयुष्यभर घरबसल्या भाडे मिळवा!

या घटनेतून काय शिकता येईल?

ही कथा आपल्याला काही महत्वाचे धडे शिकवते. योग्य गुंतवणुकीत दीर्घकाळ टिकून राहणे खूप फायदेशीर ठरू शकतं.

काही महत्वाचे मुद्दे:

📌 दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर असते
गुंतवणुकीत दीर्घकाळ टिकून राहिल्यास आपल्याला मोठा परतावा मिळू शकतो.

📌 चांगल्या गुंतवणूक वर्गात पैसे गुंतवणे गरजेचे आहे
योग्य Asset Class निवडल्यास गुंतवणूक सुरक्षित राहून अधिकचा परतावा मिळतो.

📌 जोखीम घेण्याची तयारी ठेवा, पण अभ्यास करून
गुंतवणुकीत जोखीम घ्यावी, परंतु ती घेण्यापूर्वी अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.

📌 गुंतवणुकीची कागदपत्रे जपून ठेवली पाहिजेत
गुंतवणूक केल्यानंतर त्याची कागदपत्रे व्यवस्थित जपून ठेवली पाहिजेत.

📌 योग्य सल्लागारांची मदत घ्या
गुंतवणूक करताना किंवा पैसे परत मिळवताना योग्य सल्लागारांची मदत घेणे फायद्याचे ठरते.

हे देखील वाचा: महागाई चा परिणाम: १०, २०, ३० वर्षांनंतर १ कोटी रुपयांचे मूल्य किती असेल?

निष्कर्ष:

ही कथा आपल्याला गुंतवणुकीचं महत्व पटवून देते. दीर्घकालीन गुंतवणूक आणि योग्य जोखीम घेण्याची तयारी आपल्याला आर्थिक स्थैर्य देऊ शकते. त्यामुळे, आजच योग्य गुंतवणूक योजना निवडून त्यात गुंतवणूक करा, कारण वेळ हीच सर्वात मोठी संपत्ती आहे.

शब्दांकन
अभिषेक बुचके (अर्थ विषयक अभ्यासक)
9422611264


तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि शेअर बाजाराशी निगडीत अजून माहिती  येथे वाचा!

Disclaimer: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा.

Exit mobile version